Saturday 7 September 2013

प्रतिरूप मुद्रण तंत्राचा शोध

प्रतिरूप मुद्रण तंत्राचा शोध : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिलामुद्रणाचा विकास पद्धतशीरपणे होत होता. शिलामुद्रणाची यंत्रे पूर्णावस्थेला पोचल्यानंतर या तंत्राचा विकास दोन मुख्य दिशांनी चालू होता : (१) पातळ अशा पत्र्यांवर (उदा.,खाद्यपदार्थाच्या हवाबंद डब्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या कथिलाच्छादित पत्र्यांवर) मुद्रण करणे : यासाठी मुद्रणप्रतिमेचे स्थानांतर करून ती पत्र्यांवर प्रथम तयार करून मुद्रण करण्यापूर्वी प्रतिमा एका मध्यवर्ती पृष्ठावर (मध्यवर्ती पृष्ठ म्हणजे एक रबराचा पृष्ठभाग दंडगोलावर ताणून बसवलेला असे) स्थानांतरीत करून नंतर पत्र्यावर ती छापली जात असे. (२) कागदावरील मुद्रण : हे मुद्रण प्रतिरूप पद्धतीने फारसे होत नसे. जे थोडे होत असे ते एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अखंड गतीच्या किंवा साध्या यंत्रावर होत असे.
इ. स. १९०४ च्या सुमाराला अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील नट्‌ली येथे आय्. डब्ल्यू. रूबेल या मुद्रकांनी चुकून दाब देणाऱ्या रबरी पृष्ठावर मुद्रण केले आणि नेहमीच्या मुद्रित या प्रतिमेशी या नवीन मुद्रणाची तुलना केल्यावर रबरावरून केलेल्या मुद्रणाचा दर्जा त्यांना चांगला वाटला (म्हणजे पत्र्यावरून प्रथम रबरी पृष्ठावर मुद्रणप्रतिमा स्थानांतरीत झाल्यावर तिसऱ्या सपाट पृष्ठाच्या साहाय्याने कागद रबरी पृष्ठावर दाबून मुद्रण करणे), नंतर रूबेल व त्यांचे सहकारी यांनी तीन दंडगोल बसवून एक यंत्र तयार केले आणि त्याला प्रतिरूप मुद्रण (ऑफसेट) यंत्र असे नाव दिले. त्यानंतर हे मुद्रण तंत्र पुष्कळच विकसित झाले व अजूनही त्यात काही प्रमाणात सुधारणा चालू आहेत.

शुष्क प्रतिरूप मुद्रण : आणखी काही वर्षांनी धनादेश (चेक) छापताना एक अडचण निर्माण झाली. धनादेशांवर बनावट सह्या करण्यास आळा घालण्यासाठी धनादेशाच्या कागदाच्या पृष्ठभागावर (पार्श्वभूमीवर) पाण्यात विरघळणारी शाई वापरून मुद्रण करण्याची जरूरी भासली. त्यासाठी प्रतिरूप मुद्रणाचा पत्रा काढून त्याच्या जागी अक्षरांचा एक वक्राकृती साचा किंवा नायलॉनाच्या पृष्ठावर रासायनिक कोरण करून तयार केलेली मुद्रणप्रतिमा बसवून मुद्रण करण्याची योजना मांण्यात आली. पत्रा समपृष्ठी नसून त्यावर उठावाची मुद्रणप्रतिमा असल्याने त्या प्रतिमेवर प्रथम पाणी लावण्याची जरूरी नाही. प्रतिमेवर फक्त शाई लावून ती स्थानांतराने रबराच्या पृष्ठावर स्थानांतरीत करणे व नंतर कागदावर छापणे इतकेच करावे लागते. या तंत्राला शुष्क प्रतिरूप मुद्रण किंवा अक्षर-साचा असे संबोधिले जाऊ लागले. हे तंत्र फक्त धनादेशाच्या मुद्रणापुरते मर्यादितपणे वापरले जात नसून इतर पुष्कळ प्रकारचे मुद्रण या तंत्राने केले जाते. अमेरिकेमध्ये १९५० पासून आणखी एका संयुक्त तंत्राचा उपयोग मुद्रणासाठी केला जात आहे. अखंड गती उत्कीर्ण मुद्रणाच्या यंत्रावर आणखी एक दंडगोल बसवून त्यावरील रबरी थरावर मुद्रणप्रतिमा स्थानांतरित करून नंतर कागदाच्या ताटल्या, प्लॅस्टिकच्या फरश्या, भित्तिकागद इ. वस्तूचे मुद्रण सुरू झाले.रंगीत मुद्रण : इ. स. १४५७ च्या सुमाराचे पेटर शफर यांनी सही केलेले एक सॉल्टर म्हणजे गाणी, स्तोत्रे व प्रार्थना यांचा समावेश असलेले बायबलचे पुस्तक (नंतर याचे श्रेय काही संशोधकांनी गूटेनबेर्क यांना दिले) होते. या सॉल्टरमधील प्रत्येक परिच्छेदाच्या सुरवातीचे मोठया आकारमानातील एक अक्षर त्या काळच्या हस्तलिखितांतील प्रथेप्रमाणे नक्षीदार व शोभायमान पद्धतीचे होते आणि ते दोन रंगांत छापलेले होते. याकरिता अशा अक्षराचे एकमेकांत बेमालूम बसतील असे दोन लाकडी ठोकळे तयार करण्यात आले होते आणि या दोन ठोकळ्यांवर वेगवेगळ्या रंगाची शाई लावण्याची सोय करून दोन रंग एकमेकांत बरोबर मुद्रित केलेले होते. सोळाव्या शतकात जर्मनीमध्ये अनेक लाकडी ठोकळ्यावर चित्रे कोरून त्याच्यावर शाई लावून अनेकरंगी मुद्रण करण्याचा प्रयेग केला गेला होता. सतराव्या शतकात धातूच्या पत्र्यावर हाताने कोरून त्याच्या वेगवेगळ्या भागांवर निरनिराळ्या रंगांची शाई लावून हा ठसा कागदावर एकदाच दाबून मुद्रण करण्याचेही प्रयोग झाले होते. १७१९ साली झाक क्रिस्फोट लब्लां या फ्रेंच मुद्रकांनी प्रथम काळ्या रंगाच्या आकृतीमध्ये पिवळा, लाल व निळा या रंगांच्या साह्याने चित्र छापण्याचा उपक्रम सुरू केला व त्याचे एकस्व इंग्लंडमध्ये मिळवले. त्यांनी पत्र्याच्या चार पृष्ठावर हाताने चित्रे कोरून प्रत्येक रंगाच्या महत्त्वाप्रमाणे त्यांचे मिश्रण संयोजित केले आणि एकच कागद यंत्रातून क्रमाक्रमाने निरनिराळ्या रंगांत चार वेळा छापून त्याचा बहुरंगी परिणाम साधला. एकोणिसाव्या शतकात तिरंगी विघटनाचे तत्त्व व त्यांचा पुन्हा संयोग, छायाचित्रणाचे याबाबतचे तंत्र [⟶ छायाचित्रण], जालक पटलाचा त्यात केलेला उपयोग, रासायनिक द्रव्यांचे थर व त्यांचे निरनिराळ्या रंगांना असलेले प्रकाशसंवेदन वगैरे तंत्रांचा विकास साध्य झाला. या सर्वांमुळे प्रथम आधुनिक तिरंगी मुद्रण तंत्र व नंतर काळा रंग जादा वापरुन चौरंगी मुद्रण तंत्र पुष्कळच यशस्वी झाले.

अक्षरजुळणीचे स्वयंचालन : अगदी सुरूवातीपासून अक्षरजुळणीच्या तंत्रामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता आणण्याचे प्रयत्न चालू होते. या तंत्रात यांत्रिकीकरण व स्वयंचालन हे सर्वात मोठे प्रश्न महत्तम कार्यक्षमतेशी निगडीत होते. मोनोटाइप जुळणी यंत्राने एक प्रश्न सुटला होता. कारण पुष्कळदा कागदी फितींद्वारे प्रथम अक्षरफलकांच्या साह्याने अक्षरजुळणी करणे शक्य होते व खिळे पाडण्याचे एकच यंत्र अनेक अक्षरफलकांसाठी पुरेसे होते. १९२९ मध्ये अमेरिकेत दूरस्थ नियंत्रणाने अक्षरनिर्मिती यंत्राच्या साह्याने जी अक्षरनिर्मिती सुरू झाली त्यामुळे मानवी श्रमाशिवाय किती काम होउ शकते त्याचा प्रत्यय आला व दूरस्थ नियंत्रणामुळे स्वयंचलित यंत्रही किती श्रम वाचवू शकतात त्याचा अनुभव आला. मोनोटाइप जुळणीच्या अक्षफलकाचा चालक कागदी फितींवर छिद्रे पाडून प्राथमिक काम करतो व नंतर या फितींवरून भाषांतर करणारे साधन (यंत्र) कागदी फीत वाचून जरूर त्या मातृका एकत्र जमवून एकत्र किंवा त्यांच्या साह्याने अक्षरजुळणी करते. लायनोटाइप यंत्रावर अक्षराची एक पूर्ण ओळ जुळवता येते व त्याची तासाला २०,००० अक्षरे जुळवण्याची क्षमता असते आणि वर्तमानपत्राची अक्षरजुळणी बहुधा याच तंत्राने केलेली असते.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...