Saturday 7 September 2013

चल खिळ्यांचा शोध

चल खिळ्यांचा शोध : इ. स. १०४१-४८ या कालखंडात बी शंग नावाच्या चिनी किमयागारांनी मुद्रणासाठी चल (एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येणाऱ्या) खिळ्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न केले. त्यांनी चिकण माती व डिंक यांचे मिश्रण करून त्याचा अक्षराचा खिळा तयार करून तो भाजून पक्का केला. अशा प्रकारचे खिळे जुळवून त्यांच्या ओळी तयार करून एका लोखंडी पत्र्यावर राळ, मेण व कागदाची राख यांचा थर पसरून ही अक्षरे त्यावर ठेवून तो पत्रा गरम केला व तसाच थंड होऊ दिल्यामुळे सर्व अक्षरे सरळ ओळीत एकत्र राहिली. या ओळीवर शाई लावून त्यांचे मुद्रण त्यावर कागद दाबून केले व नंतर पुन्हा पत्रा गरम करून सर्व अक्षरे सोडवून घेतली. त्या अक्षरांचा पुन्हा उपयोग करता येत असल्याने या खिळ्यांना चल अक्षरांचे स्वरूप आले. अशा तऱ्हेने अक्षरे तयार करून ती जुळविणे, त्यांचे मुद्रण करणे आणि पुन्हा उपयोग करण्यासाठी ती सोडविणे अशा सर्व गोष्टी बी शंग यांनी साध्य केल्या व त्यांतील अडचणींवर मात केली.

इ. स. १३१३ च्या सुमारास वांग जन नावाच्या दंडाधिकाऱ्यांनी एका कारागीराकडून ६०,००० हून अधिक अक्षरे लाकडी पृष्ठावर कोरून तयार करून घेतली. त्यांच्या साह्याने तंत्रविद्येच्या इतिहासावरील एक विवेचन ग्रंथ मुद्रित करून तो प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस होता. वांग जन यांनी ही अक्षरे ठेवण्यासाठी एक पुष्कळ आडव्या कप्प्यांची पेटी तयार करून ती एका उभ्या अक्षाभोवती फिरविता येईल अशी योजना करून घेतली. जरूर असलेल्या अक्षराचा कप्पा पेटी फिरवून समोर आणून ते अक्षर उचलणे सोपे जावे अशी ही योजना होती. या कल्पनेचा फायदा मात्र चीनमध्ये पुढे कोणी फारसा घेतल्याची माहिती नाही. कोरियामध्ये तेराव्या शतकामध्ये मात्र अक्षरे तयार करण्याचे तंत्र पुष्कळ प्रगत झाले होते. कोरियाच्या राजाने १४०३ मध्ये ओतीव काशापासून एक लक्ष अक्षरे तयार करण्याची आज्ञा दिली होती. नंतर १५१६ पर्यंत आणखी नऊ अक्षरसंच (फाँटस) तयार झाले अशी नोंद आहे. त्यांतील १४२० व १४३४ मध्ये तयार झाले होते. त्यानंतर यूरोपमध्ये चल खिळे तयार करण्याचे तंत्र वेगळ्या स्वरूपात अवगत झाले.

निरनिराळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या पद्धतींनी लेखनासाठी अक्षरचिन्हे निर्माण झाली. चीनमध्ये चित्रलिपीचे प्राथमिक स्वरूप आजही बरेचसे तसेच राहिले असल्याचे दिसून येते. मुद्रणाचे फार प्राचीन अवशेष चीनमध्ये सापडले. त्यावरून तेथे मुद्रणाची पद्धत फार पूर्वीपासून रूढ होती, हे उघड आहे. चित्रलिपीच्या कल्पनेतूनच पुढे अक्षरे व चिन्हे विकसित झाली व त्यातूनच पुढे लेखनपद्धती तयार झाली. प्रथम हे लेखन दगडावर किंवा विटेवर कठीण हत्याराने कोरून केले जात असे. पुढे भूर्जपत्रे किंवा ताडपत्रे यांचा लेखनासाठी उपयोग करण्यात येऊ लागला. त्यामुळे त्या त्या पानांवरील रेषांना अनुसरून लेखनपद्धतीला वळण मिळत गेले. नंतर जेव्हा कागद तयार झाला तेव्हा त्याच्यावर लिहिण्यासाठी बोरूचा किंवा फाट्याचा उपयोग केला जाऊ लागला. त्या वेळी लेखनपद्धतीमध्येही फरक पडला. उभ्या, आडव्या आणि तिरक्या रेषांच्या सांध्यांवर गोलवा आला. लेखणीच्या कोनाप्रमाणे त्या रेषांना जाड-बारीकपणा व रेखीवपणा प्राप्त झाला

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...