Saturday 7 September 2013

धात्वालेखी मुद्रण

धात्वालेखी मुद्रण : १४३० च्या सुमारास प्रचारात असलेले या प्रकारचे मुद्रण हे धातूच्या खिळ्यांवरून केलेल्या मुद्रणाच्या थोडेसे अगोदरचे असले पाहिजे; पण त्यासंबंधी सबळ पुरावा मात्र उपलब्ध नाही. मध्ययुगीन काळात धातुकामात निष्णात असलेल्या लोकांना किंवा सोन्याचांदीचे नक्षीकाम करणाऱ्या लोकांना मुद्रांचा वापर करण्याची माहिती होती. यातील निष्णात कारागिरांना त्यांच्या तंत्राचा उपयोग करून एकाच मुद्रेच्या साह्याने अनेक अक्षरे तयार करून व त्यांची जुळणी करून मजकुराचे मुद्रण लवकर करणे शक्य आहे या गोष्टीची माहिती होती. या सर्व क्रियेचे पुढील तीन भाग पाडून मुद्रणयोजना करता येईल, हे या कारागिरांना माहीत होतेः (१) लिपीतील सर्व मुळाक्षरांच्या मुद्रांचा एक संच पितळ किंवा कासे या मिश्रधातूमध्ये प्रथम कोरून तयार करणे; (२) या मुद्रांचा उपयोग करून मजकुराला लागणारी सर्व अक्षरे एका चिकणमातीच्या किंवा शिशासारख्या मऊ धातूच्या पाट्यावर जुळवून एक साचा तयार करणे; (३) शिशाचा रस या सर्व साच्यावर ओतून तो लहान पट्टीच्या रूपात घट्ट होऊ देणे. अशा पट्टीचा उपयोग उठावाच्या अक्षरांसारखा मुद्रणासाठी करता येतो.
या एकंदर पद्धतीचा फायदा असा की, प्रत्येक अक्षर मोठ्या संख्येने तयार करण्यासाठी फक्त एकदाच कोरावे लागते. एकदा मुद्रा तयार केली की, प्रत्येक अक्षर जरूरीप्रमाणे मोठ्या संख्येने तयार करता येते आणि सर्व अक्षरे दिसायला सारखी दिसतात. मातृकांवरून शिशाची अक्षरे तयार करणे खूप वेगाने साध्य होते व शिशाची अक्षरे लाकडाच्या अक्षरांपेक्षा जास्त टिकतात. मातृकांच्या एका संचापासून पुष्कळ प्रती काढून त्यांचा एकाच वेळी उपयोग करुन मुद्रणाच्या प्रतींची संख्या पुष्कळ वाढविता येते.
धात्वालेखी मुद्रण १४३० च्या सुमारास हॉलंड देशात उपयोगात आणले जात होते असे दिसते. त्यानंतरच्या काळात जर्मनीतील -ऱ्हाईनलँडमध्येही ते वापरले जात असे. _ योहान गूटेनबेर्क यांनी स्ट्रॅसबर्गला १४३४-३९ या काळात त्याचा उपयोग केला. यासंबंधीच्या प्रयोगाचा पुढे मात्र फारसा उपयोग झाला नाही कारण ओतीव धातूचा साचा हा त्रासदायक ठरला. प्रत्येक अक्षर तयार करताना मुद्रांचा उपयोग सारखा दाब देऊन करता येत नव्हता. त्यामुळे सर्व अक्षरांची उंची सारखी नसे. शिवाय एका अक्षरामुळे लगतचे दुसरे अक्षर वाकडेतिकडे होत असे. तरीही या प्रकारच्या तंत्रामुळे मुद्रा, मातृका व नंतरची ओतलेली अक्षरे यांच्या उपयोगाची माहिती झाली.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...