Saturday 7 September 2013

भवितव्य

भवितव्य : 
मुद्रणाच्या सध्याच्या प्रगतीची दिशा मुख्यतः प्रतिरूप मुद्रणच्या व उत्कीर्ण मुद्रणाच्या बाजूला दिसून येते. त्यामागे आर्थिक कारणे मुख्यतः आहेत. अक्षरांच्या खिळ्यासाठी शिशाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करावा लागतो; पण सध्या छायाक्षरजुळणी नव्याने सुरु झाली आहे व तिचा उपयोग अक्षरदाब मुद्रण सोडून इतर सर्व मुद्रणपद्धतींमध्ये केला जातो. त्यामुळे शिशाचा उपयोग सध्या फार कमी झाला आहे. अक्षरदाब मुद्रण कमी होऊन मुद्रणाचा ओघ वाढत्या प्रमाणात प्रतिरूप मुद्रणाकडे वळलेला आहे. अक्षरदाब मुद्रणाच्या पूर्वतयारीला वेळ कमी लावतो, स्टीरिओ साचे तयार करणे तुलनात्मक दृष्ट्या सोपे असते व बातमी हातात आल्यापासून ती प्रसिद्ध करण्यापर्यंत वेळ फार कमी लागतो वगैरे फायदे या पद्धतीमध्ये असले, तरी सध्या रोजची वर्तमानपत्रे प्रतिरूप मुद्रणाने छापण्याकडे जास्त प्रवृत्ती दिसून येते याचे कारण ही पद्धत जास्त सोईस्कर आहे. छायाक्षरजुळणीच्या वाढत्या सुविधा, त्यातील संगणकाची मोठी कार्यक्षमता आणि शब्द व अक्षरे स्मरणात साठवून ठेवण्याची त्याची क्षमता यांमुळे या पद्धतीने अक्षरजुळणीचे काम पूर्वीच्या कोणत्याही पद्धतीपेक्षा फार वेगाने होते. प्रतिरूप मुद्रणासाठी तयार कराव्या लागणाऱ्या पत्र्यांना कमी वेळ लागत असल्याने अक्षरदाब मुद्रणाचे फायदे खूप कमी झाले आहेत. शिवाय शिशाची किंमतही फार वाढल्याने त्याची अक्षरे जुळवणे फार खर्चाचे झाले आहे, तथापि अक्षरदाब मुद्रणात प्रतिरूप मुद्रणातील काही फायद्यांचा उपयोग आता करण्यात आला आहे. यांत धातूच्या अथवा प्लॅस्टिकच्या आवेष्टक पत्र्यांचा उपयोग व अप्रत्यक्ष अक्षरदाब मुद्रण पद्धतीचा विकास यांचा समावेश आहे. मजकुराच्या पुनारुत्पादनातील सरस रेखीवपणा हे अक्षरदाब मुद्रणाचे अद्यापही एक वैशिष्ट्य मानले जाते आणि यावरून या दोन मुद्रण पद्धतींतील स्पर्धा अजूनही चालू आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

प्रतिरूप मुद्रणाचे पत्रे करण्यासाठी व ते बदलण्यासाठी वेळ कमी लागतो आणि उत्कीर्ण मुद्रणासाठी लागणारे दंडगोल तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. यामुळेही चक्रीय गती उत्कीर्ण मुद्रणापेक्षा प्रतिरूप मुद्रण सोईचे झाले आहे. शिवाय प्रतिरूप मुद्रणाचा दर्जा तुलनात्मक दृष्ट्या जास्त चांगला वाटतो. म्हणून या मुद्रण प्रकाराकडे जास्त मुद्रक वळले आहेत व ही प्रक्रिया यापुढेही चालू राहील. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उत्कीर्ण मुद्रणासाठी दंडगोल तयार केले, तरीही प्रतिरूप मुद्रणाकडे मुद्रक आकृष्ट होण्याचे कारण त्याच्या पूर्वतयारीला लागणारा कमी वेळ व खर्च हे होय.

छायाक्षरजुळणीच्या तंत्रात अलीकडे फार वेगाने क्रांती झाली आहे. सध्या चौथ्या पिढीतील यंत्रे छायाक्षरजुळणीसाठी उपलब्ध आहेत व त्यांचा अक्षरजुळणीचा वेग फार प्रचंड आहे. साधारणपणे तासाला दीड ते दोन लक्ष अक्षरे जुळवण्याची या यंत्रांत क्षमता आहे. मात्र या यंत्रांसाठी मूळ गुंतवणूक फार मोठी लागत असल्याने व सध्याच्या तंत्रात फार वेगाने प्रगती होत असल्याने मूळ गुंतवणुकीची परतफेड योग्य वेळात होईल की नाही याबद्दल मुद्रक साशंक राहतो व छायाक्षरजुळणी यंत्र घेण्याचा निर्णय लवकर घेत नाही. १९७० सालानंतर छायाक्षरजुळणीच्या यंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊन त्याच्यामध्ये पुष्कळ वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यामध्ये मानवी पातळीवरच प्रथम अडथळा येण्याचा अनुभव आला. छायाक्षरजुळणीसाठी पूर्वी जी कागदी फीत वापरली जात होती तिच्यामुळे मानवी बुद्धीचे व श्रमाचे यांत्रिकीकरण झाल्याची भावना निर्माण झाली व मुद्रणाकडे कला म्हणून पाहिले जात होते त्यात विक्षेप आल्यामुळे त्याच्या उपयोगाकडे साशंक नजरेने पाहण्याला सुरुवात झाली. छायाक्षरजुळणी यंत्राची अक्षरे जुळवण्याची प्रचंड क्षमता लक्षात घेता त्याचा पुरेसा वापर करण्यासाठी खूप मोठे काम त्याला आवश्यक आहे व तेवढे काम सर्व मुद्रणालयांकडे उपलब्ध नसते. मध्यम आकारमानाच्या मुद्रणालयांमध्ये यामुळे जीवघेणी स्पर्धा सुरु होऊन वेगळ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र प्रतिरूप मुद्रण यंत्रांची उपलब्धता व त्यामध्ये निरनिराळ्या आकारमानांची यंत्रे आणि त्यांच्या सोयी-सुविधा यांमुळे मध्यम आकारमानाच्या मुद्रणालयांना स्पर्धा चालू ठेवणे शक्य झाले आहे. शिवाय याच मुद्रणालयांना अक्षरजुळणीच्या तंत्राला छायाक्षरजुळणी प्रतिरूप मुद्रणासाठी पूरक म्हणून वापरण्याची सोय झाल्याने मुद्रणालयाच्या एकंदर क्षमतेमध्ये पुरेशी भर पडली आहे.

भारतामध्ये १४ - १५ भाषांचा व लिप्यांचा उपयोग केला जातो. प्रत्येक भाषेमध्ये वर्तमानपत्रे व मासिके-पुस्तके आणि इतर सर्व प्रकारचे मुद्रण करण्यात येते. त्यांत देवनागरी लिपी व हिंदी भाषा यांचा उपयोग सर्वात जास्त आहे. त्यांतील काही लिप्यांचा उपयोग छायाक्षरजुळणी यंत्रावर सुरु झाला आहे व अक्षरांची रेखीव वळणे उपलब्ध आहेत. पण देवनागरी लिपी सोडली, तर इतर लिप्यांचा उपयोग पुरेसा करता येत नाही कारण त्या लिप्यांतील कामाला पुरेशी मागणी नाही व छायाक्षरजुळणी यंत्राची कामाची क्षमता फार मोठी आहे. त्यामुळे यंत्रासाठी जी भांडवली गुंतवणूक करावी लागते तिची सोडवणूक लवकर होत नाही. या कारणाने भारतामध्ये या तंत्राची वाढ सावकाश होत आहे.

दूरच्या भविष्यकाळाचा विचार केला, तर मुद्रणाच्या व्यवसायाला एक वेगळेच वळण मिळण्याचा संभव आहे. घरातच मुद्रण करणे यापुढे शक्य होणार आहे. इलेक्ट्रॉनीय तंत्राच्या मदतीने चालणारे लहान मुद्रण यंत्र विकत किंवा भाड्याने घेऊन एखादे सचित्र मासिक किंवा पुस्तक छापणे शक्य झाले आहे व हळूहळू त्यात वाढ होईल. अशा मुद्रणासाठी तंत्रज्ञानाची फार मोठी आवश्यकताही राहणार नाही कारण बऱ्याच गोष्टी स्वयंचलित राहतील. ज्या पत्र्यांच्या साह्याने मुद्रण करावे लागेल ते पत्रे दुसऱ्या कडून करून घेणे सहज शक्य होईल.

मुद्रणप्रतिमा तयार करण्यासाठी हल्ली दूरचित्रवाणी संचाचा उपयोग शक्य झाला आहे. इलेक्ट्रॉनीय तंत्राचा उपयोग करून अशा संचाचा उपयोग थोडीशी सुधारणा करून करता येतो. स्थिर विद्युत्‌ तंत्राचा उपयोग करून दूरचित्रवाणी संचावरून मुद्रणप्रतिमा पत्र्यावर तयार करता येतो व तिचा उपयोग प्रतिरूप मुद्रणासाठी करता येतो. १९६४ साली जपानमध्ये मैनिशी शिंबून या वृत्तपत्राने असा एक प्रयोग करून दाखवून दिले आहे की, ध्वनितरंग, रेडिओ तरंग किंवा दूरचित्रवाणीसाठी हल्ली ज्या जादा सुविधा (उदा, बंद-मंडल किंवा केबल दूरचित्रवाणी) उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग करून घरातच मुद्रणप्रतिमा करणे शक्य आहे. त्यामुळे या पद्धतीने एखादे वृत्तपत्र घरात लहान प्रमाणावर छापणे शक्य झाले आहे. शिवाय इतर प्रकारचे मुद्रणही या पद्धतीने घरात होऊ शकेल.  दूरचित्रवाणीवर वेगवेगळ्या परिवाहांद्वारे एखाद्या वर्गणीदाराला त्याला हवी असेल ती माहिती आधी तारीख व वेळ ठरवून पाठविता येते व तिचा उपयोग करून व्यक्तिगत रीत्या कादंबरी, मासिक, पाक्षिक, दैनिक वगैरे सर्व गोष्टी मिळवता येतात. त्यांचा मुद्रणासाठीही उपयोग होऊ शकतो. हे सर्व साहित्य तयार होऊन कमी वेळात एकदम वाचकापर्यंत पोचवणे शक्य झाले आहे.

घरातच लहान प्रमाणावर मुद्रण करणे तांत्रिक दृष्ट्या फारसे अडचणीचे राहिले नाही. मूळ भांडवली गुंतवणूक हीच एक अडचण म्हणता येईल; पण तीही अडचण हळूहळू नाहीशी होईल. कारण मुद्रणासाठी लागणारी अशा पद्धतीची यंत्रे जेव्हा मोठ्या प्रमाणात निर्माण होतील तेव्हा त्यांची किंमतही कमी होईल. त्यामुळे अक्षरांचा मजकूर व चित्रे वगैरे सर्व प्रकारचे मुद्रण कमी खर्चात व वेळात करता येईल. अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होणे कालसापेक्ष आहे व ती निर्माण होत आहे. त्यात फक्त वेळेचा प्रश्न आहे. काही देशांमध्ये आर्थिक समृद्धीमुळे हे लवकर शक्य होईल. विकसनशील देशांमध्ये वरील परिस्थिती निर्माण व्हावयाला थोडा जास्त काळ लागेल.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...