Saturday 7 September 2013

यांत्रिक अक्षरजुळणींचे प्रयत्न

यांत्रिक अक्षरजुळणींचे प्रयत्नःयांत्रिक पद्धतीने अक्षरजुळणी साधण्याचे प्रयत्न एकोणिसाव्या शतकात चालू होते; पण यांत्रिक पद्धतीने मुद्रण साधण्याकरिता कराव्या लागलेल्या प्रयत्नांपेक्षा ही अक्षरजुळणी जास्त अवघड ठरली. १८०६ मध्ये एका संपीडन साच्याचा (संकोचन क्रियेने आकार देणाऱ्या साच्याचा) शोध लागला आणि त्यामुळे यांत्रिक अक्षरजुळणीसाठी मार्ग मोकळा झाला व अक्षरे वेगाने जुळवणे दृष्टिपथात आले. १८२२ मध्ये बॉस्टनमध्ये विल्यम चर्च यांनी अक्षरजुळणीचे एक यंत्र तयार करून त्याचे एकस्व मिळविले. या यंत्रात अक्षरांच्या बटणांचा एक फलक असे व प्रत्येक अक्षराचे बटण दाबल्यावर एक अक्षराचा खिळा विशिष्ट कप्प्यातून बाहेर येऊन एका ठिकाणी जमा होत असे. या खिळ्यांची जुळणी करुन त्यांची ओळ हाताने तयार केली जात असे व शब्दांमधील अंतर सारखे करून ओळ पूर्ण करावी लागे. छपाई झाल्यावर हे खिळे पुन्हा त्यांच्या विशिष्ट कप्प्यांमध्ये परत न करता त्यांच्याऐवजी नवीन खिळे तयार करून ते ठराविक कप्प्यांमध्ये पुन्हा साठवण्यासाची कल्पना पुढे आली. या तत्त्वांवर आधारित अशी बरीच यंत्रे पुढील ५० वर्षामध्ये तयार झाली व त्यांत काही सुधारणा झाल्या. असाच एका यंत्रावरएनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या नवव्या आवृत्तीची १०,००० हून जास्त पाने जुळवली गेली होती. या यंत्रावर तासाला ५ ते १२ हजार अक्षरांची जुळणी करता येत असे. हाताने जी अक्षरजुळणी केली जात होती तीत तासाला १,५०० अक्षरे जुळवली जात. मात्र या नव्या यंत्रामध्ये अक्षरे एकामागून एक तयार होऊन बाहेर पडत आणि त्यांतून शब्द व ओळी हाताने तयार करावी लागत आणि ओळिंची लांबी सारखी करावी लागे. या प्रकारची यंत्रे अक्षरांचे परत योग्य कप्प्यांमध्ये वितरण करीत नसत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा अपुरेपणा राहिला होता. हा अपुरेपणा एक यांत्रिक वितरक त्या यंत्रावर बसवल्यामुळे दूर झाला. हा यांत्रिक वितरक म्हणजे अक्षरजुळणी करण्याच्या उलट क्रिया करीत असे. वापरलेल्या ओळींमधील अक्षरे यांत्रिक जुळाऱ्या समोरून सरकत असत आणि प्रत्येक अक्षरासाठी त्याचे बटण दाबले की, ते अक्षर त्याच्या विशिष्ट कप्प्यात परत जाऊन पडे. या यांत्रिक वितरणामुळे तासाला ५,००० अक्षरे पुन्हा त्यांच्या कप्प्यात परत पाठवता येत; पण हा वेग हाताने वितरण करण्याच्या वेगापेक्षा जास्त नव्हता. अक्षरांच्या यांत्रिक जुळणीमध्ये दोन मोठ्या अडचणी होत्या. पहिली अडचण म्हणजे ओळीची अचूक लांबी बरोबर पूर्ण करावी लागते. त्यासाठी दोन शब्दांमधील अंतर नक्की किती ठेवायला हवे त्याचा बरोबर अंदाज यावा लागे व दुसरी अडचण म्हणजे अक्षरांची ओळ वापरून झाल्यावर छापण्यामध्ये किती वेळ जाईल हे आधी सांगणे कठीण असे. त्यामुळे अक्षरजुळणी  व परत अक्षर वितरण यांची अचूक सांगड यांत्रिक रीतीने घालून एका आवर्तनात समन्वय साधत नसे.

खिळे ओतून अक्षरजुळणी  : १८८० नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी  'लायनोटाइप'  नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले. प्रत्येक अक्षराची एक मातृका अक्षराचे बटण दाबल्यावर एका ओळीत जुळून तीमध्ये पातळ अशी मिश्रधातू जोरात दाबली जाई व अखंड ओळ (शब्दांची) तयार होई. दोन शब्दांची मधील अंतर वरखाली सरकणाऱ्या पट्टीमुळे आपोआप नियंत्रित होत असे व ते सर्व शब्दांमध्ये सारखे राहत असे. प्रत्येक अक्षराच्या मातृकेला वरच्या बाजूला वेगवेगळ्या खाचांचा संच असे. त्यामुळे प्रत्येक मातृकेचे फक्त तिच्याच कप्प्यात अचूक वितरण होत असे. या तंत्रात अक्षरांच्या खिळ्यांऐवजी प्रत्येक ओळीतील मातृकांचा एक संच अक्षर दाब मुद्रणाच्या चार मूलभूत कृतींमधून जातो आणि अक्षरांचे खिळे वेगळे न होता एक पूर्ण ओळ तयार होऊन ती मुद्रणासाठी वापरली जाते. अर्थात अशा ओळीचा उपयोग फक्त एकाच वेळच्या मुद्रणासाठी होत असे. सध्याच्या काळातही या यंत्रावर तासाला ५ ते ७ हजार अक्षरांची जुळणी होते.

मेरिकेत १८८५ मध्ये टॉलबर्ट लॅन्स्टन यांनी 'मोनोटाइप' या अक्षरजुळणी यंत्राचा शोध लावला. हे यंत्र प्रत्येक अक्षर स्वतंत्रपणे पण शब्द व ओळी या क्रमाने निर्माण करते आणि दोन शब्दांमधील अंतर एका विशिष्ट मापन पद्धतीने मोजून ओळी तयार करते. यातील मातृका वेगळ्या आकारमानाच्या असतात व पुष्कळ वेळा वापरता येतात. अक्षरांचा व ओळींचा उपयोग छपाईनंतर संपल्यावर ही अक्षरे खिळ्यांच्या कप्प्यांत वितरित करता येतात किंवा वितळवून टाकली जातात. शुद्धलेखनाच्या चुका अक्षरे बदलून दुरूस्त करता येतात. लायनोटाइपावर मात्र चूक झाल्यास दुरुस्तीसाठी पूर्ण ओळ बदलून घ्यावी लागते. हल्ली अक्षरजुळणीसाठी प्रथम एका यंत्रावर कागदाची एक विशिष्ट रुंदीची फीत लावून तिच्यावर अक्षरफलकाच्या बटणांच्या साह्याने छिद्रे पाडली जातात व नंतर ही कागदाची फीत दुसऱ्या ओतकामाच्या यंत्रावर बसवून त्यातील मातृकांच्या साह्याने प्रत्येक अक्षर व त्यांचे शब्द यांची निर्मिती आपोआप (स्वयंचलितपणे) होते. या यंत्रावर तासाला १० ते १२ हजार अक्षरांची निर्मिती करता येते.

मेरिकेत १९११ मध्ये वॉशिंग्टन लडलो यांनी मोठ्या आकारमानाच्या व प्रदर्शनात्मक स्वरूपाच्या (उदा., वर्तमानपत्रातील मोठ्या शीर्षकांच्या) अक्षरांच्या जुळणीसाठी मोठ्या आकारमानाच्या मातृका हाताने जुळवून एका वेगळ्या साच्यात घालून त्यावर मिश्रधातू जोराने दाबून तिची अखंड ओळ तयार करण्याचे तंत्र शोधून काढले. या तंत्राला त्यांचेच नाव (लडलो ओतकाम) दिले आहे. ओतीव ओळ तयार झाल्यानंतर अक्षरांच्या मातृका परत हाताने त्यांच्या पेटीत वितरित कराव्या लागतात. अक्षरांची ओळ वितळवून टाकली जाते.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...